स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्यांत होण्याची शक्यता ,१ जुलैपर्यंतची मतदार यादी अंतिम,

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला असून, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत केलेली मतदार यादीच अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे मतदारांच्या नोंदणी, नावात दुरुस्ती अथवा वगळण्याची प्रक्रिया १ जुलैपर्यंतच करता येणार होती.
निवडणूक आयोगाने भारतीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या यादीवर आधारित नवीन मतदार यादी तयार केली आहे. या यादीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातील महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा प्रस्ताव आयोगाकडून तयार केला जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक यांसारख्या प्रमुख महापालिकांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्वरित नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांची निवडणूक दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात होईल.
यासोबतच ओबीसी आरक्षणासंदर्भात ट्रिपल टेस्ट प्रक्रियेचे पालन करूनच आरक्षण आराखडा निश्चित करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्टशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत, हे लक्षात घेता सर्व प्रक्रिया नियमानुसार राबवली जात आहे.
राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चा तयार करण्यास सुरुवात केली असून, पुढील काही आठवड्यांत राज्यात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे.