लोकसंख्या ही एक साधन संपत्ती आहे. मात्र भारताच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या कमी करून या वाढत्या लोकसंख्येला साधनसंपत्तीत कसे रूपांतरित करता येईल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भारताची सर्वच लोकसंख्या ही समस्या नसून जे लोक काम करत नाही, जे लोक सकारात्मक विचार करत नाही हेच लोक भारताची समस्या ठरत आहे. भारतात कष्ट करणाऱ्यांची संख्या अधिक असून आज जागतिक स्तरावर भारत हा तरुणांचा देश म्हणून गणला जात आहे. ही युवाशक्ती भारताला विकसित राष्ट्र बनवण्यापासून रोखू शकत नाही. कष्टाळू प्रामाणिक लोकसंख्या ही भारताचे बलस्थान आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे आयोजित लोकसंख्या दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भूगोल विभाग प्रमुख डॉ. पोपट कुदनर, डॉ. उपेंद्र पठाडे, डॉ.संतोष दळवी, डॉ. दीपा कुचेकर, डॉ. दत्तात्रय फलके, डॉ.नारायण शिंदे व डॉ. छाया भोज आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे पुढे म्हणाले, आज भारत सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक खर्च करत आहे, विद्यार्थ्याने कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन त्याचा उपयोग स्वतः बरोबर आपल्या देशाला कसा होईल याचा विचार करावा. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेत असताना आपल्या स्वतःला पडलेले प्रश्न शिक्षकांना विचारून त्याचे निराकरण करणे गरजेचे आहे. संशोधन वृत्ती आपल्यात विकसित करावी असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.पी.एस.कुदनर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सपना बेडसे यांनी केले तर आभार डॉ. संतोष दळवी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला प्रा. संगीता कुशारे व धनश्री देशमुख आदी शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.