जनसामान्यांचा असामन्य सूर्य म्हणजे- मा. शरद पवार
आजच्या वर्तमान भारतीय राजकारणात कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा संगम असलेला एकमेव महानेता जर कोण असेल ? तर ते म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले एकमेव नेते शरद पवार हे होय. जाणता राजा, संकटमोचक द्रष्टा लोकनेता, ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. शरद पवार हे होय.
भारतीय राजकारणात, समाजकारणात, आणि महाराष्ट्रासह देशाच्या विकास प्रक्रियेत शरद पवार साहेब यांच्या नावाला जे वलय आहे. ते क्वचितच इतर कोणत्या नेत्यांना अनुभवायला आले असेल. गेली अनेक दशके ज्या नावाभोवती केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण फिरत आहे. ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार! महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातल्या सामन्यातील सामन्य माणसाला आपल्या समस्या सोडवण्यासाठी व आपले गराने मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे शरदचंद्र पवार साहेब हे होय. शरद पवार या नावाचं गारूड देशभरात असून, त्यांच्या नावाची देशात वेगळीच छाप आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शरद पवार साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने विचारनिष्ठांचं, विचारशीलाचं, आणि सकारात्मक कार्य निपुणता असलेलं नेतृत्व आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व आपल्याला वेगवेगळ्या रूपाने सतत भेटत राहते. यशवंतरावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत शरद पवारांची राजकीय घोडदौड सुरू झाली असून, कोणताही भक्कम आधार नसताना राजकारणात प्रवेश करणाऱ्या शरद पवारांनी आजपर्यंत भारतीय राजकारणात आपले नाव अस्तित्व आणि आपण स्वत: स्थापन केलेल्या आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षण मंत्री व केंद्रीय कृषिमंत्री पदापर्यंत झेप घेत, त्यांचा प्रवास आजही सुरूच आहे. शेतकऱ्यांची काळजी घेणारा “जाणता राजा” म्हणूनही त्यांना ओळखले जाते. साहेबांनी आजवर शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न हाती घेऊन ते तडीस नेले आहेत. शेतकऱ्यांच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी धडपडणारे एक व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाणांनी बारामतीच्या खाणीतून शोधलेल्या या हिऱ्याला कुणी साहेब म्हणत! कुणी विकासपुरुष! तर कुणी राजकारणातला ध्रुवतारा असे संबोधते. प्रत्येक व्यक्तीला समजून घेवून त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची सवय, प्रत्येकाचीच आपुलकीने विचारपूस करणे, कोणत्याही जाती-पातीची व धर्माची बंधने न पाळता आपल्याकडे समस्या घेवून येणाऱ्या प्रत्येकाचीच आपुलकीने विचारपूस ते नेहमीच आपुलकीने करत असतात. शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्म घेतलेले, बारामतीच्या परिसरात जनतेत कार्य केलेले शरद पवार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यापूर्वी कधीही शर्ट पॅन्ट व सफारी कोणत्याही राजकीय नेत्याने घातलेली नव्हती, त्याची सुरुवात शरद पवार साहेबांनी केली आणि राजकारणात शर्ट-पॅन्ट सफारी वापरणारी नवीन पिढी आली ती शरद पवार साहेबांपासूनच.
देशातील कृषी क्षेत्र व कृषी क्षेत्रात काम केलेला एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख आहे. समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीटपणे जाणून घेणे हे त्यांच्या स्वभावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. राजकीय असो की, वैचारिक व्याख्यानाला असो किंवा अंतरराष्ट्रीय क्षेत्रातील युनोचे व्यासपीठ असो, त्यांनी आपली वैचारिक भूमिका कायमच जबाबदारीने पार पाडलेली आहे. त्यामुळे कुठलीही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मुळाशी जाणे जन्मताच त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. यासाठी ते दिवसाची रात्र करून, सतत काम करतात म्हणूनच त्यांना जनसामान्यांच्या मनातील लोकनेता म्हणून स्थान प्राप्त झालेले आहे. सुसंस्कृत समाजकारणाची कास धरून, विधायक समाज उन्नतीसाठी झटणारे, प्रयोगशील धोरणांचा पुरस्कार करणारे पवार साहेब हे सामान्य माणसामध्ये सहा दशकांहून अधिक काळ 'आपला हक्काचा माणूस' ही ओळख कायम टिकवून आहेत. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रत्येकालाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. सांस्कृतिक विचार आणि कलाक्षेत्र या विषयी अभिजात जाण असलेले पवार साहेब हे साहित्यिक व कलावंतांना कायमच राजाश्रय देऊन, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळेच ते एक रसिक म्हणन इतिहासाचे निर्माते ठरलेले एकमेव नेते आहेत.
शिक्षण क्षेत्रात पवार साहेबांनी अफाट काम केलेले आहे. प्रशिक्षणाचा प्रयोग राज्यात नाशिक पासून पवार साहेबांनी सुरू केला, मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्य व देशभरातील अनेक मुले शिक्षण घेत आहेत, शैक्षणिक इतिहासात त्यांच्या अशा असंख्य प्रयोगांची आणि बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानची नेहमीच चर्चा होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहेतुक प्रयत्न आणि सर्व समाजघटकांना आपलंसं करून सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी मांडली आहे. पवार साहेबा विषयी जितके लिहावे बोलावे तेवढे कमी आहे. राजकारणापासून ते क्रीडा विश्वापर्यंत आणि शेतीपासून ते डिजिटल जगापर्यंत सर्वच क्षेत्रात त्यांचे ज्ञान वाखाणण्यासारखे आहे. आपल्या मधुर वाणीतून कार्यकर्त्यांनाच नव्हे तर जणसामान्यांना आपलंसं करून घेण्याची साहेबांची हातोटी आहे. त्यांनी सामन्यातील सामान्य कुटुंबातल्या गरीब मुलांना आमदार बनवले, मंत्री केले आणि खऱ्या अर्थाने ते समाजातल्या शेवटच्या स्तरातील लोकांचे ते नेते ठरले. शरद पवार साहेबांनी विज्ञान व तंत्रज्ञानातही मोठे कार्य केले आहे. विविध क्षेत्रात कार्य कर्तृत्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी पवार साहेब प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. प्रशासकीय कामात असलेला त्यांचा हातखंडा हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा आधार बनलेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, शिक्षण व क्रीडा विश्वावर ठसा उमटवणारे सुपरपॉवर व्यक्तिमत्व पवार साहेबांना लाभलेले आहे.
जनसामान्याबद्दल असलेली तळमळ व आपुलकी यातूनच त्यांनी प्रचंड मोठे काम उभे केले. त्यांच्या इतका बहुश्रुत आणि सामान्यांबद्दल तळमळ असलेला नेता अद्याप तरी दुसरा झालेला नाही. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना पाणी आडवा-पाणी जिरवा, जलसंधारण मध्ये विकसित केलेले रूपांतर अधिक सक्षम व नवतंत्रज्ञान, मोठी यंत्रसामुग्री वापरून युद्धपातळीवर केले. नवे सीसीटी सिमेंटबांध लहान तलाव, शेततळ्यांचे भक्कम जाळे निर्माण केले.
कृषीमंत्री झाल्यावर पायलट योजनांमधून कृषी विद्यापीठ, शेती पूरक दुग्ध व्यवसाय, अधिक उत्पादनांची ऊस, केळी इ. प्रकारची शेती त्याला जोडव्यवसायास चालना देवून, त्यासाठी लागणारे आर्थिक बळ त्यांनी उभे केले आणि राज्यातील बळीराजाला बळकट केले. राजकारणा व्यतिरिक्त साहित्य कला क्रीडा उद्योग, कृषी, व्यापार, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात साहेबांना रुची आहे. या सर्व क्षेत्रात जी मंडळी निष्ठेने कार्य करतात, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन ते नेहमीच देत असतात. पवार साहेबांचे विचारच इतर राजकारण्यांपेक्षा वेगळी आहे. करण कोणत्या जिल्ह्यात कोण उत्कृष्ठ लेखक, उत्कृष्ठ खेळाडू आहे, हे साहेब तोंडी सांगू शकतात, साहेबांना विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात कमालीची रुची आहे. नव्या ज्ञानाबद्दल त्यांना आस्था आहे. या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांची ही त्यांना जाणीव आहे.
पवार साहेबांनी बारामती ते दिल्लीपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार पाडत आज वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षी देखील स्वतःच्या प्रकृतीस्वास्थ्याला दुय्यम स्थान देऊन, पवारसाहेब सामान्य माणसाच्या समृद्धीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या वयात देखील साहेब तरुण वर्गांचे आदर्श महानायक बनलेले आहेत. महाराष्ट्रासाठी जीवाचे रान करणाऱ्या पवार साहेबांना अनेक विरोधकांचा व त्यांच्या कुटील डावांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो, असे असले तरीही आपल्या अनेक विरोधकांमध्ये सुद्धा त्यांनी अनेकांशी मैत्रीचे कायम संबंध जोपासले आहेत, त्यामुळे मा. शरद पवार साहेब हे एक फक्त व्यक्ती नसून, ते एक विचार, एक चळवळ, माणसाला माणुसकी देणारी एक नवी प्रयोगशाळा आहेत.
एक साहित्यीक बारमतीमध्ये गेले असताना, त्यांना एक म्हातारी आजी शेतात काम करताना दिसली, तेव्हा त्या साहित्यीकाने त्या आजीला विचारले तुम्हाला उन्हाचे चटके बसत नाही का, तेव्हा त्या आजीने अतिशय समर्पक उत्तर दिले, डोक्यावर शरदा सारखे चांदणे असताना, चटके देणारा सूर्य उगवणारच नाही, म्हणून मला चटके बसत नाहीत. प्रत्येकाला हवेहवेसे व आपले वाटणारे पवार साहेब हे एकमेव राजकीय नेते आहेत. माझ्या सारख्या अनेक तरुणांचे आदर्श असलेले साहेब आजही मोठ्या उमेदीने महाराष्ट्रासाठी लढा देत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माझी आई म्हणते आयुष्यात कितीही संकटे आले तरी या संकटात तू शरद पवारांसारखे ठाम पणे उभी रहा, तेव्हा शरीरात दहा हत्तींच बळ येत. महाराष्ट्राच्या या वटवृक्षाने हजारो पलव्या जन्माला घातल्या व त्या फुलवल्या आहेत. त्यातले उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय आर.आर. आबा पाटील हे होय. म्हणूनच तर आज प्रत्येक जण पवार साहेबांना आधारवड मानतो. ज्या माणसा पुढे कर्करोग सुद्धा हतबल झाला. तो देवदूतच मानला पाहिजे, अश्या देवदूत पवार साहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा..!!
कु. अदिती सुनिल काळे, संशोधक विद्यार्थीनी,
पंचवटी महाविद्यालय नाशिक
https://forms.gle/amZj6yKPUgWaoZzx7