‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत चित्रपट प्रेमींसाठी "अबाऊट एली" चित्रपटाचे सादरीकरण

‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत  चित्रपट प्रेमींसाठी "अबाऊट एली" चित्रपटाचे सादरीकरण

नाशिक (प्रतिनिधी) :  विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत *मंगळवार  25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता सुप्रसिद्ध इराणी दिग्दर्शकअसगर फरहदी हयांचा अबाऊट एली हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. 

इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणारी काही मित्रमंडळी निघाली आहेत सहलीला, शहरापासून दूरच्या एका शांत ठिकाणी. ही आहे सेपिदे, आपली नायिका. तिचा नवरा आमीर आणि त्यांची ८-९ वर्षांची छोटी मोरवारीद. पेमन, त्याची पत्नी शोहरेह आणि, मुलं ५-६ वर्षांचा अराश आणि ३-४ वर्षांची अनिता. मनूचेहर आणि त्याची पत्नी नाझिया. या सर्वांचा मित्र अहमद आणि पाहुणी, चित्रपटाच्या शीर्षकातली एली.

अहमद असतो जर्मनीत, त्याचा नुकताच घटस्फोट झालाय आणि तो काही दिवसांसाठी तेहरानला आलाय. सेपिदे त्याच्यासाठी वधू शोधतेय. एली ही मोरवारीदची शिक्षिका आहे आणि सेपिदेशी तिची नुकतीच मैत्री झालीय. तिला एली खूप आवडलीय आणि तिची इच्छा आहे की अहमद आणि एलीची गाठ घालून द्यावी. म्हणून तिने तिला या सहलीवर ओढून आणले आहे.हा सगळा काबीला शेवटी एका समुद्रकिनाऱ्यावरच्या  बंगल्यात जमतो. सहलीचं आनंदी वातावरण आहे. हास्यविनोदात, खेळकरपणे, चेष्टामस्करीत सहलीचा पहिला दिवस जातो. सगळ्यांना एली आवडली आहे. अहमदलाही. दुसरा दिवस सुरू होतो ... आणि अचानक एली नाहीशी होते. जसजसे एकेक गोष्ट पुढे येते तसतसे सारे वातावरण बदलते. काल सगळ्यांना आवडलेल्या एलीबद्दल आज शंका-कुशंका सुरू होतात. अचानक एखादे अरिष्ट कोसळल्यावर माणसे कशी बदलतात, भांबावतात, उलटेसुलटे निर्णय घेतात, फसत जातात ते समोर येते.

असगर फरहदी कधीच ही किंवा ती बाजू घेत नाहीत. ते हे सर्व आपल्यासमोर मांडतात आणि आपल्याला सोडून देतात, विचार करायला, स्वतःचे मत बनवायला. ते हळूच आपल्याला त्या सहलीचा भाग बनवतात आणि आपल्याला ती सगळी भावनिक आंदोलने जगू देतात.

आणि हो, एलीचे काय? त्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल. एलीची गोष्ट ऊर्फ ‘अबाऊट एली’.

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा कालावधी 120 मिनिटे आहे.

सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर व विश्वास टर्फ यांचे सहकार्य लाभले आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास  लीलावती जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर यांनी केले आहे.