बिटको महाविद्यालयात ' मराठी भाषा गौरव दिन ' उत्साहात साजरा...

बिटको महाविद्यालयात ' मराठी भाषा गौरव दिन '  उत्साहात साजरा...

नाशिकरोड : " स्वातंत्र्यानंतर सैरभैर समाजाला एकसंघ करण्यासाठी सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जपण्यात पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्या कुसुमाग्रज यांचा मोलाचा वाटा होता. नाशिक भूमीत गोदावरीमुळे जनस्थान रुजले. अनेक धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रांतीचा वारसा नाशिक नगरीला आहे. मराठी भाषा  व्यवहाराची  भाषा व्हायची असेलच तर ज्ञान, अर्थकारण, तंत्र याची अभिव्यक्ती मराठीतून व्हावी. मराठीचा अभिमान बाळगा शिक्षण मराठीत घेऊन सुसंवाद साधा, लिखाण करा , " असे नाट्य कलावंत व दिग्दर्शक तसेच लोकहितवादी मंडळ अध्यक्ष श्री. मुकुंद  कुलकर्णी यांनी केले.

          गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या ११२ व्या जन्मदिनानिमित्त मराठी विभागातर्फे ' मराठी भाषा गौरव दिन ' साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते . याप्रसंगी व्यासपीठावर मुकुंद कुलकर्णी यांचे समवेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.  मंजुषा कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. कल्याणराव टकले, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.  आकाश ठाकूर, मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सरस्वती पूजन करण्यात येऊन कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.के. एम.लोखंडे यांनी केले. 

        अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी, " मराठी भाषा ही ज्ञानभाषा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रजांनी मोलाचे योगदान दिले. मराठी भाषेला प्रतिभा संपन्न वारसा, सर्वांग सुंदर व मधुर गोडवा, साहित्य संस्कृती व परंपरा आहे. मराठी भाषेची थोरवी काव्यात्मक रुपात मांडण्याचा संत ज्ञानेश्वरांनी व गोविंदाग्रजांनी, अनेक कविंनी, संतांनी, साहित्यिकांनी केला.  मराठी भाषेचा अभिमान बाळगा.आपल्या बोलीतून,व्यवहारातून मराठी भाषेत संवाद साधावा, मराठी भाषेची अस्मिता, स्वाभिमान जपा व संवर्धन करा, " असे सांगितले.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गीतांजली चिने यांनी केले तर आभार प्रा.अमर ठोंबरे यांनी मानले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. शरद नागरे यांनी करून दिला. कार्यक्रमास मराठी विभागातील प्राध्यापक प्रा. आर. बी. बागुल,  डॉ.  शरद नागरे,  सौ.  वृषाली उगले, सौ.  मीना गिरडकर,  प्रा. डॉ. विजय सुकटे, प्रा. राजाराम तराळ यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.