खेडगाव महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न

खेडगाव महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न
खेडगाव महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न
खेडगाव महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न

खेडगाव येथील मविप्र संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्कूल कनेक्ट (एनईपी २०२०) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सुरेश डोखळे, सुखदेव ठुबे, मधुकर पवार आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगोल अभ्यास मंडळ, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सदस्य तसेच सिडको महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर पवार, प्राचार्य डी एन कारे उपस्थित होते.

             कार्यशाळेच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी सुरेश डोखळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सक्षमपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना व पालकांनाही भविष्यातील शिक्षणाची वाटचाल निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक धोरण गांभीर्याने घेण्याऐवजी त्याची जाणीव करून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी शैक्षणिक धोरणाची व त्यातील मसुद्याचा आराखडा मांडून चित्रफितिसह विद्यार्थ्यांना माहिती दिली. शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पदवीच्या सर्व विषयातील सर्व समावेशक क्रेडिट प्रणाली, प्रत्येक सेमिस्टर व विषयानुसार असलेले क्रेडिट पॉईंट्स इ. चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे मांडले. कार्यशाळेच्या नियोजित वेळेमध्ये पुणे विद्यापीठाने निर्मित केलेला व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपुढे दाखविण्यात आला. अंतिमतः प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एन कारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शैक्षणिक धोरण २०२० बद्दल जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करत असताना विविध पर्याय उपलब्ध असल्याचे व व्यावसायिक शिक्षणाकडे घेऊन जाणारे असे हे नवीन शैक्षणिक धोरण असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 

भारत सरकारने संसदेमध्ये एकमताने ठराव मंजूर करून शैक्षणिक धोरण-२०२० पारित केले. त्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून होत असल्यामुळे तालुका पातळीवर इयत्ता बारावी पास झालेल्या व प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शैक्षणिक धोरण-२०२० याबद्दलची सर्व माहिती प्राप्त व्हावी तसेच पुढील शिक्षणासाठी भावी वाटचाल स्पष्ट व्हावी, या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी पुणे विद्यापीठाचे भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य व सिडको महाविद्यालयाचे आयक्युएससी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर पवार,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एन कारे, समन्वयक डॉ. विठ्ठल जाधव, डी के निकम संयोजक डॉ. विकास शिंदे, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक, बारावी उत्तीर्ण झालेले व प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.